गृहीतकांनी निष्कर्षाला आलो झटपट (गझल)

गृहीतकांनी निष्कर्षाला आलो झटपट

तथ्यांनी तर झाली असती केवळ फरफट

माझ्यातर्फे बोलायाला समोर असते

पिच्छा माझा सोडत नाही माझी चौकट

कलेकलेने सर्व हातुनी निसटत गेले

हाती उरली केविलवाणी आदळआपट

टिकेल कुठवर याची काही खात्री नाही

एकाएकी झाला आहे कायापालट

वाऱ्यानेही उगाच माझे कान फुंकले

रक्तामध्ये भिनू लागली होती घुसमट

अशाचसाठी चर्चेला मी नाही म्हणतो

मुद्द्यावरती येता येता होतो कडवट

काय आणखी व्हायचे इथे बाकी आहे?

किती आणखी होऊ शकतो आपण बोथट?

- विश्वजीत गुडधे

Primarily I write Ghazals. Published poems in two Poetic Collective Books namely "Rutu Shabdanche" & "Soor Mazyamaniche" Poetry published in various magazines, journals & newspapers. Lyricist for : Music Album titled "Chandane Fulafulanche", Documentary Film called "Kaudanyapur"; songs sung by renowned singer Uttara Kelkar, Title song of GCOEA's Technical Festival Prajwalan - Kashtiya